Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात ‘हाका मारी बाई’ या नावाचे पोस्टर व बॅनर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १९९० च्या दशकात या नावामुळे शहरात दहशतीचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर २०२६ मध्ये पुन्हा मोरवाडी सिग्नलसह शहरातील विविध भागांत अशा स्वरूपाचे जाहिरात फलक व पोस्टर लावण्यात आल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी ॲड. सागर रतन चरण, सदस्य जिल्हा दक्षता समिती (महाराष्ट्र शासन) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना निवेदन दिले आहे.

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात कोणत्याही माध्यमातून अनधिकृत, भीती निर्माण करणारे किंवा चुकीचा संदेश देणारे पोस्टर-बॅनर लावणे हे नियमबाह्य असून त्यावर तात्काळ कारवाई करणे हे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे कर्तव्य आहे. मात्र महानगरपालिकेसमोरच असे प्रकार घडत असताना संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शहरातील विविध ठिकाणी अद्यापही अशी पोस्टर दिसत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज व भीतीचे वातावरण पसरत आहे. हे प्रकार महाराष्ट्र मानव बलिदान आणि इतर अमानुष, अघोरी व अपमानजनक प्रथा व काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ॲड. चरण यांनी महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व अनधिकृत पोस्टर-बॅनर त्वरित हटवावीत, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहरात पुन्हा कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version