पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. घराघरात सुरू असलेली ‘घड्याळा’ची टिक-टिक ही केवळ प्रचाराची भाषा न राहता, मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध, लोकाभिमुख आणि मुद्देसूद प्रचारावर भर दिला आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा संधी या विषयांवर त्यांनी थेट संवाद साधत नागरिकांची मने जिंकली आहेत. “काम बोलते” या भूमिकेतून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.
प्रचारादरम्यान सोसायट्या, झोपडपट्टी भाग, बाजारपेठा आणि मुख्य चौकांमध्ये झालेल्या भेटीगाठींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी भाऊसाहेब भोईर यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत, “आमच्यासाठी नेहमी धावून येणारा नेता” अशी भावना व्यक्त केली आहे. यामुळे विरोधकांची धावपळ वाढली असून, प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे.
एकूणच प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार वेग घेत असताना, भाऊसाहेब भोईर यांची पकड दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ‘घड्याळा’ची टिक-टिक आणखी जोरात ऐकू येणार, अशीच चिन्हे सध्या प्रभागात दिसून येत आहेत.
