पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या प्रचाराला आता नवे बळ मिळाले असून त्यांच्या अर्धांगिनी प्रियांका नढे यांनी थेट प्रचार मैदानात उतरत आघाडी घेतली आहे. महिलांशी थेट संवाद, घराघरात भेटी, समस्या जाणून घेणे आणि भाजपच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडणे, या माध्यमातून त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे.
प्रियांका नढे यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभागातील महिला मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा, शिक्षण तसेच स्वावलंबनाचे प्रश्न या मुद्द्यांवर त्या थेट संवाद साधत असून, “महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व भाजपकडे आहे,” असा विश्वास त्या नागरिकांमध्ये निर्माण करत आहेत.
या प्रचारादरम्यान महिलांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. त्यावर प्रियांका नढे यांनी निवडणुकीनंतर या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या महिला-केंद्रित योजना, लखपती बहीण योजना, बचतगटांना आर्थिक मदत, आरोग्य व शिक्षणातील सवलती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
राजकीय जाणकारांच्या मते, प्रियांका नढे यांची मैदानातील उपस्थिती ही भाजपसाठी महत्त्वाची ठरणार असून, महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विनोद नढे यांच्या विकासाभिमुख कामकाजाला प्रियांका नढे यांचा थेट जनसंपर्क लाभत असल्याने प्रभाग २२ मधील निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
एकीकडे विरोधकांकडून टीका सुरू असताना, भाजपकडून मात्र “विकास, विश्वास आणि महिला सक्षमीकरण” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार सुरू असून, प्रियांका नढे यांच्या सक्रिय भूमिकेमुळे प्रभाग २२ मध्ये भाजपचा प्रचार अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
