Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी परिसरात भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात करत ‘काळेवाडीत शिवस्मारक होणारच’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. भाजपचे उमेदवार विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गाठीभेटी व प्रचार दौऱ्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी विचारांची ताकद एकवटताना दिसत आहे.

आज झालेल्या गाठीभेटी व प्रचारादरम्यान प्रभागातील सर्व शिवभक्त, हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक कार्यकर्ते एकत्र आले. विनोद नढे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार नागरिकांच्या थेट भेटीसाठी मैदानात उतरले. घरोघरी जाऊन संवाद साधताना शिवस्मारकाचा मुद्दा, परिसराचा विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न यावर भर देण्यात आला.

सायंकाळी झालेल्या प्रचारफेरीला अजिंक्य मित्र मंडळ परिवाराने भव्य दिव्य स्वागत करत प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रचारफेरीदरम्यान अजिंक्य कॉलनी, क्रांतिवीर कॉलनी तसेच परिसरातील सुमारे सहा सोसायट्यांमध्ये सखोल प्रचार करण्यात आला.

प्रचारादरम्यान “शिवस्मारक हा काळेवाडीच्या अस्मितेचा विषय आहे” असे सांगत विनोद नढे यांनी नागरिकांना विकासाची ठोस दृष्टी मांडली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी संधी, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारशाचे जतन या मुद्द्यांवर भाजपची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

काळेवाडीत शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून भाजप आणि विनोद नढे यांनी प्रचाराला धार दिली असून, शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटनांची एकजूट ही भाजपसाठी मोठी ताकद ठरत आहे. येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, काळेवाडीतील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version