पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी प्रभागातील विविध सोसायट्यांना भेटी देत थेट नागरी संवाद साधला. प्रचाराच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा मार्ग अवलंबत त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा आढावा घेतला.
सोसायटीतील रहिवाशांनी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पार्किंग तसेच सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत, निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला. “विकास हा कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसला पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
नागरी संवादातून विश्वास निर्माण होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिक प्रश्नांची जाण, सातत्यपूर्ण संपर्क आणि पारदर्शक कामकाजाची भूमिका यामुळे शत्रुघ्न काटे यांना सोसायटी स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रभाग २८ मधील राजकीय वातावरणात त्यांची उपस्थिती अधिक ठळक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
