Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (चिंचवडगाव–केशवनगर) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. चिंचवडगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या महासाधू श्री मोरया गोसावी महाराज मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून भाजपने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली.
महासाधू श्री मोरयांच्या चरणी नतमस्तक होत भाजपचे गट क मधील अनुक्रमांक चारचे अधिकृत उमेदवार ॲड. मोरेश्वर चंद्रकला ज्ञानेश्वर शेडगे यांच्यासह सौ. अपर्णा निलेश डोके, सौ. मनिषा योगेश चिंचवडे आणि श्री. सुरेश शिवाजी भोईर यांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताला प्राधान्य देण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे परिसरात सकारात्मक आणि उत्साही राजकीय वातावरण निर्माण झाले.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी विशेष योजना आणि प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर भर दिला. “चिंचवडगाव–केशवनगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असून, भाजपच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमामुळे प्रभाग १८ मध्ये भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून, प्रभागातील राजकीय समीकरणे तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version