Spread the love

निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपची ‘वेट अँड वॉच’ रणनीती; उमेदवार यादी रखडल्याने पक्षात अस्वस्थता

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असताना आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी उफाळू नये, यासाठी भाजपने आखलेली ही ‘गोपनीय’ आणि ‘संयमित’ रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्षाकडून अधिकृत घोषणेला विलंब होत असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र हालचालींना वेग आला आहे. काही प्रभागांतील इच्छुकांना वरिष्ठ नेत्यांकडून अनौपचारिक संदेश देत “कामाला लागा” असे स्पष्ट संकेत देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अंतिम यादी जाहीर न झाल्याने या संदेशांचे राजकीय वजन किती, याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तिकीटाच्या प्रतीक्षेने वाढली धाकधूक
“यादी अंतिम टप्प्यात आहे”, “आज-उद्या जाहीर होईल” अशी उत्तरे देत पक्षाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचे चित्र आहे. या विलंबामागे संभाव्य बंडखोरांना रोखण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, तिकीटाच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक ना उघड प्रचार करत आहेत, ना माघार घेत आहेत. अंतिम निर्णय कधी होणार, याची उत्सुकता आणि चिंता दोन्ही शिगेला पोहोचल्या आहेत.
निरोप मिळालेल्यांना दिलासा, उरलेल्यांची कोंडी
रविवारी अचानक काही प्रभागांतील मोजक्या इच्छुकांना संपर्क करून काम सुरू करण्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे अनेकांनी आपली इतर कामे थांबवून प्रचार यंत्रणा सज्ज केली. काही ठिकाणी पॅनलनिहाय, तर काही ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात संपर्क साधण्यात आला. मात्र, याच वेळी अनेक इच्छुक दिवसभर मोबाईलवर नजर खिळवून बसले होते. सायंकाळ उलटूनही निरोप न आल्याने त्यांच्या अस्वस्थतेत भर पडली.
सोशल मीडियावर ‘स्वघोषित पॅनल’चा धडाका
दरम्यान, पक्षात नुकतेच प्रवेश केलेल्या काही बड्या नेत्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा न होता थेट आपापले पॅनल सोशल मीडियावर जाहीर केल्याने भाजपच्या अंतर्गत राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे. तिकीट मिळणे गृहीत धरत वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षचिन्ह आणि प्रचार साहित्य वापरले जात असल्याने जुने इच्छुक अधिकच नाराज झाले आहेत. “तिकीटासाठी रांग लावण्याची गरज नाही,” असा अप्रत्यक्ष संदेश यातून दिला जात असल्याची भावना पक्षात आहे.

एक पाय आत, दुसरा बाहेर
अधिकृत यादी जाहीर न झाल्याने या स्वघोषित उमेदवारांनाही थांबवून ठेवण्यात आले आहे. परिणामी, अनेक इच्छुकांची अवस्था ‘एक पाय पक्षात आणि दुसरा पाय बाहेर’ अशी झाली आहे. वेळ कमी, अनिश्चितता अधिक आणि अंतर्गत अस्वस्थता तीव्र—अशा स्थितीत भाजपची उमेदवार यादी कधी जाहीर होते, याकडे संपूर्ण राजकीय शहराचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version