Spread the love

 

ग्राहकहिताला प्राधान्य देणारी सुलभ व पारदर्शक कार्यपद्धती राबवा..

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कंपनीने राबवलेल्या ‘रिस्ट्रक्चरिंग’ प्रक्रियेचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत असून, सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक तथा पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य मा. संतोष सौंदणकर यांनी महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देत तातडीने रिस्ट्रक्चरिंग प्रक्रियेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिस्ट्रक्चरिंगअंतर्गत कामांची विभागणी झाल्यानंतर पूर्वी एका ठिकाणी होणारी कामे आता चार वेगवेगळ्या विभागांमध्ये अर्ज सादर करून करावी लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण कार्यालयातील टेबल फिरविण्याची वेळ येत असून, साध्या कामांसाठीही वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. फाईली एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर ढकलल्या जात असल्याने कामे मुद्दाम विलंबाने होत असल्याचा अनुभव अनेक ग्राहक घेत आहेत.

दरम्यान, या रिस्ट्रक्चरिंगला कर्मचारी वर्गाचाही अंतर्गत विरोध असल्याचे चित्र असून, प्रशासनावर नाराजी व्यक्त करता येत नसल्याने त्याचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे. काही कार्यालयांत ग्राहकांशी असहकाराची वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

महावितरण पूर्वी ग्राहककेंद्री सेवा देणारी संस्था म्हणून ओळखली जात होती; मात्र सध्याच्या कारभारात सुसंगततेचा अभाव दिसून येत आहे. कोणत्या कामासाठी कोणत्या अधिकाऱ्याकडे जावे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने ग्राहक गोंधळात पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांच्या कामांची स्पष्ट विभागणी दर्शविणारे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्राहकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी महावितरणने तातडीने रिस्ट्रक्चरिंग प्रक्रियेचा आढावा घेऊन ग्राहकहिताला प्राधान्य देणारी, सुलभ आणि पारदर्शक कार्यपद्धती अमलात आणावी; अन्यथा ग्राहकहितासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version