पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ तसेच भारत नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही दिनदर्शिका केवळ तारीख व सणांची माहिती देणारी नसून, लघुउद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक ठरणारी आहे. दिनदर्शिकेमध्ये टी.डी.एस., ई.एस.आय., जी.एस.टी. रिटर्न, प्रॉव्हिडंट फंड वर्गणी भरणा यासंबंधीची सविस्तर व उपयुक्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच सर्व जाती-धर्मांचे सण-उत्सव, थोर समाजसेवकांच्या जयंती व पुण्यतिथी यांची माहितीही या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे लघुउद्योग क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात नियोजन व कायदेशीर बाबींमध्ये मोठी मदत होणार असून, संघटनेचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
