Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करत प्रचाराला अधिकृत सुरुवात केली. आज, शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथे प्रचार प्रमुख  विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

या पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवार म्हणून  विठ्ठल उर्फ नाना काटे, सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातून मिनाक्षी अनिल काटे, तर सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून  शितल नाना काटे आणि सौ. सायली उमेश काटे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुजोबां महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

यानंतर पिंपळे सौदागर गावठाण येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या प्रचारफेरीत ग्रामस्थ, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात फेरी काढत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रचारफेरीला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना संबोधित करताना श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, शहरातील सर्व प्रभागांमध्ये ५० टक्के आरक्षणानुसार दोन महिला व दोन पुरुष उमेदवारांचे पॅनल असते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक २८ हा एकमेव प्रभाग आहे, जिथे तीन महिला व एक पुरुष असा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्यामुळे या पॅनलला शहरातील सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पहिल्याच पॅनलच्या प्रचार शुभारंभाने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वातावरणात निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version