Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समर्थ युवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पांडे यांच्या सहकार्यातून भाजपच्या अनिता संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ येथे महिलांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर बुधवार (दि. २६) आणि गुरुवार (दि. २७) रोजी चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई लेन येथे पार पडले.

शिबिरात स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या मॅमोग्राफी, सीबीसी, ब्लड शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल तपासणी, तसेच डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले. याशिवाय तब्बल ₹९,५०० किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्याने प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे, भाजपच्या महिला आघाडीच्या अनिता संदीप काटे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचा कर्मचारी वर्ग, तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शत्रुघ्न काटे म्हणाले, “महिलांचे आरोग्य हे कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचा पाया आहे. कॅन्सरबाबत जागरूकता वाढवणे आणि तपासण्या वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनिताताई आणि संदीप काटे यांचा हा उपक्रम प्रभागातील महिलांसाठी मोठी दिलासा देणारी सेवा आहे. पुढील काळातही अशा उपक्रमांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील.”

अनिताताई संदीप काटे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, “महिलांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढत असताना अशा तपासण्या सर्वांपर्यंत विनामूल्य पोहोचणे आवश्यक आहे. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायक आहे. आगामी काळातही महिला आरोग्य, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी अधिक उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे.”

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी भाजप कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version