Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने शहरातील अनेक दिग्गज इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. ज्या प्रभागात दशकभर सामाजिक कामे केली, पक्षसंघटना उभी केली, मतदारांशी नाळ जुळवली… त्या स्वतःच्या “होम ग्राऊंड” मधूनच नाव गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घोळामुळे अनेकांचे राजकीय गणित ढवळून निघाले असून निवडणूक विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रभागबदलाचा धडाका — हजारो मतदारांचे पत्ते उलटसुलट
नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप यादीत हजारो मतदारांचे नाव एका प्रभागातून सरळ दुसऱ्या प्रभागात ढकलले गेले. काही ठिकाणी तर संपूर्ण सोसायट्या, वस्त्या, कॉलन्या—सगळ्यांचा प्रभागच बदलला.
आधार कार्ड, रेशनकार्ड, विजबिल यांसारखे निर्विवाद पुरावे असतानाही अनेकांची नावे चुकीच्या प्रभागात टाकली गेल्याने सर्वसामान्य नागरिकही वैतागले आहेत.
 इच्छुकांची अडचण वाढली — उमेदवारीच धोक्यात!
ज्या इच्छुकांनी त्या-त्या प्रभागात वर्षानुवर्षे पक्षाची बांधणी केली, विकासकामे चालवली, मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला… अशा अनेकांच्या घराचा पत्ता अचानक “प्रभागाबाहेरचा” दाखवला गेल्याने त्यांची संभाव्य उमेदवारीच धोक्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
 विरोधकांचा आरोप — “हा निव्वळ घोळ नाही, हा राजकीय डाव!”
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की ही केवळ प्रशासकीय चूक नसून, गेलेल्यावेळेस सत्ताधाऱ्यांना फटका बसलेल्या प्रभागांमध्ये “सीमा–बदल व मतदार–बदल” करून वातावरण आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विरोधकांनी याला “निवडणुकीपूर्वीचा सूक्ष्म राजकीय हस्तक्षेप” असे संबोधत निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे.
 नागरिकांचा प्रश्न — “बरोबर पत्ता असताना प्रभाग का बदलला?”
प्रारूप यादीवरील नोंदणीदरम्यान सर्वाधिक आक्षेप ‘घराचा पत्ता जसाच्या तसा आहे, मग प्रभाग का बदलला?’ यावर नोंदवले जात आहेत.
यादी अशीच अंतिम झाली, तर हजारो मतदारांना आपल्या जुन्या प्रभागात मतदानच करता येणार नाही.याचा थेट फटका स्थानिक नगरसेवक, इच्छुक आणि भविष्यातील राजकीय समीकरणांना बसणार आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version