काळेवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी विजय नगर येथील खेळाच्या मैदानावर आज काळेवाडी सोसायटी फेडरेशनच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी आणि अनेक सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान विभाग अधिकारी देखील उपस्थित होते.
या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे परिसरातील हरित पट्टा वाढवणे, पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मुलांना व तरुण पिढीला निसर्गाची ओळख करून देणे हे होते.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विजय सुतार, सचिन काळे, मल्लेश कद्रापुरकर, विजया सुतार, संतोष कदम, प्रकाश लोहार, भरत ठाकूर, सुधाकर नलवडे, प्रदीप शिंदे, संदीप शिंदे, राहुल रोकडे, ओम क्षीरसागर आणि देवेंद्र जाधव यांची उपस्थिती लाभली. सर्वांनी मिळून मैदानाच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावली आणि त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली.
हा उपक्रम संपूर्ण काळेवाडी परिसरासाठी प्रेरणादायी ठरला असून नागरिकांमध्ये निसर्गप्रेम वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
