Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना विविध सूचनाही केल्या.

यावेळी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी गोरखनाथ निमण, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, किशोर ननवरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे, उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज, मंडलाधिकारी संजय तळपाडे, सहाय्यक आरोग्याधिकारी सुधीर वाघमारे, लोकशाही युवा फाऊंडेशन अध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सोमवारी झालेल्या लोकशाही दिन उपक्रमात नागरिकांकडून विविध तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. त्यामध्ये महापालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी उभारलेल्या भाजी मंडईंमध्ये भाजी विक्रेत्यांना येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, महापालिकेच्या जागांवर कब्जा केलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, महापालिकेने विविध कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांच्या कामांवर लक्ष ठेऊन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, कार्यालयात ओळखपत्र परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, शहरातील पाण्याच्या टाक्या सुशोभित कराव्यात, मोकाट जनावरे व श्वानांचा बंदोबस्त करावा, अनधिकृत पत्राशेड, बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करावी, अनधिकृत बांधकामांमुळे अरूंद झालेले रस्त्यांवर योग्य उपाययोजना करून अडथळेविरहीत वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावेत, रस्त्यांवर सिमेंटचे ब्लॉक न बसविता रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण करण्यात यावे आदी सूचनांचा समावेश होता.

शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांनी मांडलेले मुद्दे आणि सूचनांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. महापालिका प्रशासनाचे उद्दिष्ट लोकाभिमुख, गतिमान आणि कार्यक्षम असावे हे लक्षात ठेवून प्रत्येक समस्येवर तत्परतेने कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त (३), पिंपरी चिंचवड महानगरपालिका

लोकशाही दिनासाठी असा करा अर्ज
लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या विहित नमुन्यातील अर्ज नागरिकांना महापालिकेच्या वतीने सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
विहित नमुन्यातील अर्ज करतांना तक्रारवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांच्या नावाने १५ दिवसांच्या अगोदर दोन प्रतीत नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठवणे आवश्यक राहील.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version