ताज्या घडामोडीपिंपरी

“अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर नैतिक जबाबदारीने करावा!” – प्रा. डॉ. सदानंद मोरे

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -“अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर नैतिक जबाबदारीने करावा; तसेच राजकीय नेत्यांनी आपली भाषा सुधारली पाहिजे!” अशी अपेक्षा लोकसंस्कृतीचे भाष्यकार प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी मोशी येथे रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केले.
इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. सदानंद मोरे यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
संदीप तापकीर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना डॉ. मोरे सरांनी दिलखुलास उत्तरे दिलीत. आई शिक्षिका आणि वडील प्रसिद्ध कीर्तनकार अन् प्रवचनकार असल्याने घरातूनच सुसंस्कार घडले. त्या काळातील अग्रगण्य वृत्तपत्रे आणि नियतकालिके घरात येत असल्यामुळे शालेय वयातच वाचनाची गोडी लागली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक नामांकित मंडळी वडिलांना भेटायला येत. त्यांच्या चर्चा ऐकून विद्यार्थिदशेत अंगी बहुश्रुतता आली. याशिवाय बबनराव जगताप आणि लक्ष्मणराव या व्यक्तींची दूरदृष्टी अन् राजकीय तसेच सामाजिक जाण प्रगल्भ असल्याने वयाच्या मानाने विचारांमध्ये सजगता आली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ असल्याने सभोवताली अनेक महत्त्वाच्या घटना घडत होत्या. घराण्यातील आध्यात्मिक वारशामुळे आपणही कीर्तनकार व्हावे, अशा ऊर्मी मनात दाटून येत. प्री डिग्रीला  असताना तुकाराममहाराज यांच्यावर एक लेख लिहून आचार्य अत्रे यांना पाठवला. आश्चर्याची बाब म्हणजे अत्रे यांनी लेख आपल्या दैनिकात छापलाच पण सदानंद मोरे ही कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावी या कल्पनेने ते दस्तुरखुद्द देहूत भेटावयास आले; पण मी पोरसवदा असलेला पाहून ते चकित झाले. या घटनेनंतर मी अत्रेंशी स्नेहबंधाने जोडला गेलो. त्यामुळे सार्वजनिक निवडणुकीत अत्रे यांच्या जाहीर सभेचे देहूत आयोजन केले होते. दरम्यान शिक्षण पूर्ण करून मी अहिल्यानगर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो.
पहिला कवितासंग्रह अत्रे यांनीच प्रकाशित केला. ‘विशाल सह्याद्री’ आणि ‘श्रमिक विचार’मध्ये वैविध्यपूर्ण लेखन केले. ‘मंथन’ या वैचारिक लेखसंग्रहाला प्रा. नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना लाभली. हळूहळू व्याख्याता म्हणून ओळख मिळत गेली. सदा डुंबरे यांनी ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये सदरलेखनाविषयी विचारणा केली. त्यातून ‘तुकारामदर्शन’ हा महत्त्वाचा ग्रंथ सिद्ध झाला. पुढे या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. ‘उजळत्या दिशा’ या नाटकाला लोकांनी स्वीकारले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य करता आले. विद्यापीठात विविध अध्यासनांवर काम करण्याची तसेच तुकाराम अध्यासन उभारण्याची संधी मिळाली. बालभारती तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थांवर आमंत्रित करण्यात आले. ‘दी गीता ॲज थेअरी ऑफ ह्युमन ॲक्शन’ या पोस्ट डॉक्टरल प्रबंधामधून ‘या सम हा’ हे सर्वस्वी वेगळे कृष्णचरित्र साकारले. ‘लोकमान्य ते महात्मा’ , ‘गर्जा महाराष्ट्र’ , ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ , ‘ये मराठीचिये नगरी’ या पाच बृहद ग्रंथांनंतर ‘विश्वाचे आर्त’ या जागतिक इतिहासात्मक ग्रंथाचे लेखन चालू आहे. घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा ईश्वरीय आशीर्वाद वाटतो, अशी भावना डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
त्यापूर्वी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांचा जीवनप्रवास राजेंद्र घावटे यांनी मुलाखतीतून श्रोत्यांसमोर उलगडला. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button