“स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!” – डॉ. संजय उपाध्ये

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?’ या विषयावर ६०वे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. ह. भ. प. पुरुषोत्तममहाराज पाटील, किसनमहाराज चौधरी, साहित्यिक श्रीकांत चौगुले, नाना शिवले, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
याप्रसंगी श्रीकांत चौगुले यांनी, “एकाच ठिकाणी एकाच वक्त्याकडून विविध विषयांवर सातत्याने प्रवचन होणे हा एक विक्रम आहे!” असे मत व्यक्त केले; तर नाना शिवले यांनी, “पिंपरी – चिंचवड शहरात वैचारिक क्रांती घडविण्याचे कार्य गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालांनी केलेले आहे!” असे गौरवोद्गार काढले.
सातत्याने साठ महिने प्रवचनमालिकेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, सुहास पोफळे तसेच कार्यालयाचे व्यवस्थापक अवधूत कुलकर्णी आणि कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात आला; तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व श्रोत्यांचे कपाळावर कुंकुमतिलक लावून, भगवे मानाचे वस्त्र, गुलाबपुष्प आणि मिष्टान्न प्रदान करून स्वागत करण्यात आले. कुणाल साठे यांनी शिववंदना सादर केली. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “आपल्या परंपरा अन् प्रतीकं यांच्यामागे शास्त्रीय विचारांची बैठक आहे. आपण शाळेत प्रतिज्ञा शिकतो; पण त्यातील तत्त्व पाळतोच असे नाही. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र म्हणून आम्ही स्वतंत्र झालो तरी त्यासोबत येणारी कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही पाळतो का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने माझ्या स्वतंत्र वागण्याचा इतरांवर अनिष्ट आणि विपरीत परिणाम होत तर नाही, याचे भान ठेवायला हवे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याबाबत यज्ञ आणि वणवा यांमधील कलात्मक विधायकता अन् विघातकता ओळखली पाहिजे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याने अनेक गोष्टींची मुभा दिली असली तरी त्याचा वापर करताना विवेक आणि तारतम्य पाळायलाच हवे. कौटुंबिक स्वातंत्र्यात नीतिमूल्यांचा विचार केला पाहिजे; तर समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्या मर्जीनुसार वागली पाहिजे, हा अट्टाहास नको. हिंदू धर्मात अभिभक्तीचे स्वातंत्र्य आहे; पण हिंदू समाजाची अवस्था विखुरलेल्या बिंदूंसारखी झाली आहे; तर संपूर्ण भारतीयांची दशा कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणे झाली आहे. जात, पात, धर्म असे भेद विसरून एकजुटीने आणि एकदिलाने राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करा!” असे आवाहन त्यांनी केले. भगवद्गीता, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु. ल. देशपांडे असे विविध संदर्भ उद्धृत करीत नर्मविनोदी शैलीतून डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. महेश गावडे, गोपी बाफना, अजय लोखंडे, हर्षा लोखंडे, हेमा सायकर, गीतल गोलांडे, अण्णा नलावडे, स्नेहल पोफळे, नवनाथ सरडे, विजय देशमुख, चंद्रकांत पवार, बंडू बारसोडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.













