ताज्या घडामोडीपिंपरी

“स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी लाभत नाही!” – भाऊसाहेब भोईर

Spread the love

 

मधुश्री व्याख्यानमाला – प्रथम पुष्प

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी लाभत नाही!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी  निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले.

मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘कलारसिक ते सिनेनिर्माते’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना भाऊसाहेब भोईर बोलत होते. कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे अध्यक्षस्थानी होते; तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्यानापूर्वी, आदर्श गृहनिर्माण संस्था म्हणून स्वप्नपूर्ती फेज – १, कृष्णा हौसिंग, रस्टन ग्रीव्हज आणि परमार या संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून मधुश्री कला आविष्कार या संस्थेच्या चौदा वर्षांच्या कालावधीतील विविध उपक्रमांची माहिती दिली. अमित गोरखे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वाचनसंस्कृतीचा लोप झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर व्याख्यानमालांचे महत्त्व अबाधित आहे!” असे मत व्यक्त केले.

भाऊसाहेब भोईर पुढे म्हणाले की, “इयत्ता चौथीत असताना मी बालगंधर्व येथे ‘गुंतता हृदय हे’ हे पहिले व्यावसायिक नाटक पाहिले; पण खरे सांगायचे तर नाटकापेक्षाही मला तिथला बटाटेवडा बेहद्द आवडला होता. मात्र, हळूहळू विनोदी नाटकं आवडू लागली. नकळत आपण स्वतः कलाकार व्हावे असे वाटू लागले. शालेय वयात हलगी या वाद्याचे खूप आकर्षण होते. एकदा संधी मिळाल्यावर इतकी मनापासून हलगी वाजवली की, इयत्ता दहावीपर्यंत सातत्याने वादनाची संधी मिळत गेली. दरम्यान इयत्ता सातवीमध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडून आलो. आकाशवाणीवर मुलाखत झाली. क्रीडा क्षेत्रातही सुप्तगुणांना वाव मिळाला. विद्यार्थिदशेत अनेक आशा – आकांक्षा अंतर्मनात दबा धरून बसलेल्या असायच्या. अर्थातच सर्व काही अनुकूल घडत होते असे नाही. घरची आर्थिक परिस्थिती साधारण होती. वडिलांचा खूप धाक होता. पुणे शहर सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न होते, तशी संपन्नता पिंपरी – चिंचवडला लाभावी, असा मनाने ध्यास घेतला होता. ऐन तारुण्यात नगरसेवक म्हणून निवडून आलो; आणि त्याच काळात विवाहसुद्धा झाला. एकाचवेळेस राजकीय आणि प्रापंचिक जबाबदारी अंगावर आली होती.

११ ऑगस्ट १९९६ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सुरू केली. त्यावर एका बाजूने कौतुक तर दुसर्‍या बाजूने टीकासुद्धा झाली. १९९८ मध्ये परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानातून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यशस्वी करून दाखविले. अर्थातच त्यामुळे सांस्कृतिक जबाबदारी अन् अपेक्षा अधिकच वाढली. सुदैवाने सर्व पक्षीय राजकीय व्यक्तींनी भक्कम पाठबळ दिले. साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या सहवासात वावरता आले. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाचा पुरस्कार सुरू करावा, अशी कल्पना मनात आली. पहिला पुरस्कार आनंदघन अर्थात लतादीदी यांना प्रदान करण्यात आला. पिंपरी – चिंचवडच्या इतिहासात न भूतो न भविष्यति असा सोहळा संपन्न झाला. यानिमित्त मंगेशकर कुटुंबीयांशी जोडला गेलेला ऋणानुबंध मला कला क्षेत्रात वाटचाल करताना खूप मौलिक ठरला. पुरस्कारानिमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्वांना जवळून अनुभवता आले.

‘खेळ सात बार्‍याचा’ या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती करताना कवी ग्रेस यांनी गीतलेखन केले. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले. लतादीदींनी माझ्यासाठी चार ओळींचे गायन केले; तर आशा भोसले यांनी उर्वरित गीते म्हटली. चित्रपटाला आर्थिक यश मिळाले नाही; पण मला आत्मविश्वास मिळाला. ‘मोकळा श्वास’ या चित्रपटाने नावलौकिक आणि मानसिक समाधान मिळवून दिले. लौकिक यश मिळत असताना पत्नीच्या निधनाचे कौटुंबिक आघात सहन करावे लागले; पण हृदयनाथ मंगेशकर यांनी धीर दिला. माझे सर्व चित्रपट सामाजिक भाष्य करणारे आहेत. मुलगी पार्श्‍वगायिका म्हणून नावारूपास आली, याचा मनापासून आनंद वाटतो. संगीत, साहित्य, नृत्य, कला यांच्याशिवाय माणूस ही कल्पनाच सहन होत नाही. आयुष्यात खूप माणसे वाचली. ग्लॅमर, प्रसिद्धीच्या मागे माणसे धावतात; पण कोणतेही क्षेत्र असले तरी कष्ट, सातत्य, समर्पण, संस्कार यांना पर्याय नाही!”

राज अहेरराव, अश्विनी कुलकर्णी, अजित देशपांडे, विनायक गुहे, उज्ज्वला केळकर, राधिका बोर्लीकर, मनीषा मुळे, रेणुका हजारे, चंद्रकांत शेडगे, चिंतामणी कुलकर्णी यांनी संयोजनात सहकार्य केले. नेहा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button