ताज्या घडामोडीपिंपरी
“सुपर वुमन होण्यासाठी टीपकागदासारखे बनून समाजातील चांगल्या गोष्टी टिपून घ्या! – अश्विनी गोरे

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सुपर वुमन होण्यासाठी टीपकागदाप्रमाणे बनून समाजातील चांगल्या गोष्टी टिपून घ्या!” असा बहुमोलाचा कानमंत्र शिक्षणतज्ज्ञ आणि क्लारा स्कूलच्या समन्वयक अश्विनी गोरे यांनी खिंवसरा – पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे शनिवार, दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी विद्यार्थिनींना दिला. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, आशा हुले, अतुल आडे आणि सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.
खिंवसरा – पाटील शिक्षण संकुलामध्ये पौगंडावस्थेतील विद्यार्थिनींशी मनमोकळा सुसंवाद साधताना अश्विनी गोरे पुढे म्हणाल्या की, “स्वप्न बघणे ते स्वप्नपूर्ती करण्याच्या प्रवासात विद्यार्थिनींनी ‘स्व’ची ओळख करून घ्यावी. आपल्यातील बलस्थाने, उणिवा, प्रगतीसाठीच्या संधी याचा विचार करावा. तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी चांगल्या गोष्टी जरूर ऐका. मोबाइलवरती चांगले वक्तृत्व, थोरांचे विचार सातत्याने ऐका. जो जास्त चांगले ऐकतो तोच चांगले बोलूही शकतो. कुठे, कधी, काय बोलावे? याचे संभाषणकौशल्य जाणीवपूर्वक विकसित करावे. बोलताना भावनांचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. जसे श्रवण महत्त्वाचे आहे तसेच तुमच्या या वयात तुम्ही काय आणि कोणती पुस्तके वाचता हेदेखील महत्त्वाचे आहे. या वाचनाने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. जेव्हा तुमच्यातील श्रवण, भाषण, वाचन ही कौशल्ये योग्य रीतीने विकसित होतील तेव्हा तुम्ही सर्जनशीलतेने लेखन करू शकाल. थोडक्यात
I – स्व ची ओळख
L- श्रवण
S- भाषण
R- वाचन
W- लेखन
ही कौशल्ये विकसित करण्यासाठी आपली भूमिका टीपकागदाप्रमाणे ठेवली तर समाजातील चांगल्या गोष्टी टिपता येतात!” विद्यार्थिनींनी दिलेल्या दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर अश्विनी गोरे यांनी “मैं रहू या ना रहू” हे सुरेल गीत गायले. सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी शारदास्तवन आणि “जन्म बाईचा खूप घाईचा” हे सुरेल गीत सादर केले. सहशिक्षिका अश्विनी जाधव यांनीे सूत्रसंचालन केले.
मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी आभार मानले.














