चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे! – डॉ. राजेंद्र कांकरिया

Spread the love
‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “समाज आणि शासनाने विचारवंत, कलावंत आणि साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे!” अशी अपेक्षा प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी शांतिबन गृहरचना संस्था, चिंचवड येथे व्यक्त केली.
शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी छाया कांकरिया या साहित्यिक दांपत्याचा ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शिवाजीराव शिर्के यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला. शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांची याप्रसंगी उपस्थिती होती.
प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया आपली साहित्यिक वाटचाल कथन करताना पुढे म्हणाले की, “तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आयोजित केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरात सहभागी झाल्यानंतर माझ्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला.१९९३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पिंपरी – चिंचवड शाखा सुरू केली; कारण माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचे कार्य ही चळवळ करते. माणसाला पुनर्जन्म नाही. देव अस्तित्वात असता तर त्याने माणसात भेदभाव केला नसता. बुवाबाजी, अनिष्ट प्रथा यांचा सर्वाधिक फटका दीनदुबळ्या व्यक्तींना बसतो. बंदुकीने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत; पण तरीही प्रबोधन ही खूप अवघड गोष्ट आहे. त्याला विवेकाची जोड द्यावी लागते. राम, कृष्ण आणि शिव हे सर्वकालीन आदर्श पुरुष मानले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्तम गुणांचा अंगीकार केला पाहिजे!” छाया कांकरिया यांनी आपल्या प्रपंचातील सहजीवनाच्या आठवणींना उजाळा देताना, “सरस्वतीचे अधिष्ठान असले की तेथे लक्ष्मी निश्चितच वास करते!” अशी भावना व्यक्त केली. शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “भारतीय संस्कृती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते!” असे मत मांडले.
यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. तुकाराम पाटील, श्रीकांत चौगुले, आय. के. शेख, राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, सविता इंगळे, शुभांगी घनवट, नंदकुमार मुरडे, सुभाष चटणे, माधुरी डिसोजा, प्रभाकर वाघोले यांनी आपल्या मनोगतांमधून कांकरिया दांपत्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विशद केले. बाबू डिसोजा, अशोक कोठारी, कैलास भैरट, संजय गमे, आनंद मुळूक, मधुश्री ओव्हाळ, प्रकाश सातव, श्रीराम नलावडे, श्रीरंग मोहिते, संगीता सलवाजी, बबन तरस, राजेंद्र पगारे या सुहृदांनी शुभेच्छा सोहळ्यात सहभाग घेतला.
तानाजी एकोंडे यांच्या अभंगगायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सुरेश कंक यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करणारे गीत म्हटले. सुप्रिया लिमये यांनी ‘बोलावा विठ्ठल…’ या भक्तिगीताचे सुरेल सादरीकरण केले.
मुरलीधर दळवी, भावेश जैन, अशोकमहाराज गोरे, क्षितिजा जैन, शामराव सरकाळे, फुलवती जगताप, चैतन्य बारसावडे, शरद काणेकर, प्रीतिजा बारसावडे, अण्णा गुरव, युवंश जैन, परिशा जैन यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button