सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती विद्यार्थ्यांनी थांबवू नये

क्विक हील प्रमुख अनुपमा काटकर यांचं आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय व क्वीक हील यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा नागरिकांसाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शिक्षा फार सायबर सुरक्षा या अभियानात प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहर, रुपीनगर , तळवडे, लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालयात, भाजी मंडई, बस स्थानके येथे जाऊन सुरक्षेबाबत लोकांना, विद्यार्थीना जनजागृती व मार्गदर्शन केले.
या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी विद्यार्थामधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 12 विद्यार्थ्यांचा क्वीक हील फाउंडेशनच्या प्रमुख अनुपमा काटकर, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, किर्लोस्कर ग्रुपचे माणिकराव पाटील, अजय शिर्के, गायत्री केसकर, डॉ. जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. सुप्रिया गायकवाड आदींच्या उपस्थितीत सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
क्विक हील फाउंडेशनच्या प्रमुख अनुपमा काटकर आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.जयश्री मुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. उज्वला फलक यांनी विद्यार्थ्यानी विविध ठिकाणी केलेल्या जनजागृतीची माहीती चित्रफीतीद्वारे सविस्तर विशद केली.
क्वीक हील फाउंडेशनच्या प्रमुख अनुपमा काटकर पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यानी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती विविध ठिकाणी जावून सर्व थरातील लोकांबरोबर प्रत्यक्ष संपर्क साधून केली. आज ज्याचा सन्मान झाला त्यानी बक्षीस मिळाले म्हणजे आपले कार्य संपले असे समजू नये, तुमच्या भावी आयुष्याच्या खरा प्रवास आता सुरू होत आहे असे माझे मत आहे. विविध ठिकाणी सायबर गुन्हा बाबत जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन तुम्हीच केले. त्यामुळे तूमच्यात नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आज मला वाढलेला दिसून आला आहे. ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. लोकांबरोबर संपर्क साधून त्यांना समजेल अशा भाषेत काही ठिकाणी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. आज खऱ्या अर्थाने तुम्ही लीडर झाला आहात, भावी काळात जोमाने कार्यरत राहण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, कमला शैक्षणिक संकुलात आज साडेसात हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांच्या नेतृत्व विकास, त्याच्या अंगी असलेले वैयक्तिक सुप्त कलागुणाचा विकास व्हावा यासाठी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा नेहमीच पुढाकार घेत त्यानी विविध संस्था, उद्योजकाबरोबर संस्थेने अतर्गत सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. आज सायबर गुन्ह्यात सर्वत्र वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी टोळ्याच कार्यरत आहे . युवा वर्गात गुन्हेगाराची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर योध्दा विद्यार्थ्यांनी स्वतः सजग राहून इतरांना यापुढे सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले . यावेळी किर्लोस्कर ग्रुपचे माणिकराव पाटील, अजय शिर्के यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सायबर सुरक्षाची शपथ उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ. जयश्री मुळे यांनी केले. प्रस्तावना हर्षिता वाच्छानी यांनी तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी बटूल परवाला, आमना शेख यांनी तर आभार दिपू सिंग यांनी मानले.













