ताज्या घडामोडीपिंपरी

सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव द्या; जनसेवक अमित पसरणीकर यांची मागणी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानास आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सांगवी येथील जनसेवक अमित पसरणीकर यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी आमदार अश्विनी जगताप यांना निवेदन दिले आहे. जनसेवक अमित पसरणीकर यांनी सांगितले की, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

जनसेवक अमित पसरणीकर यांनी सांगितले की, स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे पिंपरी-चिंचवड शहरासाठी खूप मोठे योगदान आहे. लक्ष्मणभाऊ जगताप हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक होते. स्थायी समिती सभापती, पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले. तसेच, विधान परिषद सदस्य होते. तर सलग तीन वेळा विधानसभेचे ते चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत, विकासात त्यांचे मोठे योगदान होते. कामगार, कष्टकरी तसेच, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची शहरभरात ख्याती होती.

दूरदृष्टी ठेवून काम करणार्‍या आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव या पीडब्ल्यूडी मैदानास द्यावे. या मैदानाच्या विकासासाठी त्यांनी विविध माध्यमातून प्रयत्न केले. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन याच मैदानात भरविण्यासाठी ते आग्रही होते. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना व रूग्णांना मोफत आरोग्य तपासणी शिबिरही याच मैदानावर भरवत. याच मैदानात आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेस जनसागर उसळला होता. ती स्पर्धा राज्यात विक्रमी गर्दीची ठरली होती. तसेच, विविध क्रीडा स्पर्धांचे याच मैदानात त्यांनी आयोजन केले होते, असे जनसेवक पसरणीकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button