संजोग वाघेरे यांना महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटनेकडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. या बाबत महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात वाजंत्री समुहांमध्ये काम करणाऱ्या बहुजन समाजातील तुतारीवादक, शहनाई वादक, हलगी वादक, तसेच बँड पथक बँजो पार्टी, नाशिक बडे ढोल वादक इत्यादी पथकांमध्ये काम करणाऱ्या मालक व चालक कलावंतांसाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून राज्यात एकमेव असणाऱ्या महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष संघटनेकडून संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष सागर गायकवाड, सरचिटणीस विजयराजे खंडागळे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब जगधने यांनी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर करीत आहोत, असे पत्रकात नमूद केले आहे. तसेच उमेदवार वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह संघटनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचवणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.




















