संचेती हॉस्पिटल येथे जागतिक ध्यान दिवस साजरा ध्यानधारणेमुळे मन:शांती व नवचैतन्य – सरिता दीदी

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संचेती हॉस्पिटल येथे शनिवारी पहिल्या जागतिक ध्यान धारणा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ध्यानधारणेचे शास्त्र आणि तंत्र यावर मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी (सरिता राठी) यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी संचेती हॉस्पिटलमधील डिजिटल प्रमुख रूपल संचेती,संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी,वरिष्ठ भूलतज्ञ डॉ.पी.एस.गर्चा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय वक्ता व राजयोग संस्थेतील वरिष्ठ शिक्षिका ब्रह्मकुमारी सरिता दीदी म्हणाल्या की, मनातील विचारांचे काहूर दूर केल्यावर पुढची दिशा समजू शकते. माझ्यासोबतच असे का घडले असे विचार रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णामध्ये असतो.नकारात्मक विचार व भविष्याची चिंता असते.नातेवाईक देखील त्रस्त असतात.अशा वेळेस मन स्थिर करून, नकारात्मक विचार दूर करून व सद्य परिस्थितींचा स्वीकार करून आपण मन सशक्त बनवू शकतो.सशक्त मनाने आपण या परिस्थितींचा सामना करू शकतो.ध्यान हे आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा प्रज्वलित करते . ध्यान-धारणा म्हणजे डोळे बंद करणे नव्हे तर खऱ्या अर्थाने डोळे उघडणे हे असते.
*संचेती हॉस्पिटलमध्ये पथदर्शी उपक्रम*
संचेती हॉस्पिटल्सने नुकतेच ध्यानधारणा कक्ष सुरू केला होता . पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच कक्ष आहे.रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रूग्णालयातील कर्मचारी यांच्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.आपला स्नेही किंवा नातेवाईक रूग्णालयात दाखल असताना त्याच्या काळजीपोटी येणारे नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी या कक्षाचा लाभ अनेक रूग्णांचे नातेवाईक घेत आहेत.
सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे दृष्टीने एक पुढचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलने ‘नो अँगर झोन’ ची घोषणा केली आहे.रूग्णालयात दाखल असलेल्या आपल्या प्रियजनांच्या उपचारादरम्यान सकारात्मक आणि सहयोगात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यामध्ये रूग्णालयातील एक हजार अधिक कर्मचारी व डॉक्टर्स सहभागी असतील.पुढील तीन महिन्यात विविध टप्प्यांमध्ये बह्मकुमारीज्चा एक भाग असलेल्या राजयोग एज्युकेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन तर्फे ध्यानधारणेसाठी कर्मचारी व डॉक्टर्सना प्रशिक्षित केले जाणार आहे.
संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती म्हणाले की, शारीरिक उपचाराबरोबर तर मानसिक स्वास्थ देखील तितकेच महत्त्वाचे असते.आमच्या येथील ध्यानधारणा कक्ष याच विचारांचे प्रतीक आहे.नो अँगर झोनच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दृष्टीने हे पुढचे पाऊल आहे.













