श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढीपूजन

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढीपूजन
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला. तसेच आरती करून गुढीपूजन करीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुणे शहर शांत रहावे, शहरात कायदा सुव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पुढील काळात देखील ती चांगल्या स्थितीत राहिल, असा विश्वास आहे. शांतता आणि चांगल्या वातावरणात प्रत्येकाचे आयुष्य असावे, हीच प्रार्थना त्यांनी केली.
सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, महाराष्ट्र सुखी समाधानी होवो, सर्वत्र शांतता प्रस्थापित होवो, जे भारताचे स्वप्न आहे की २०४७ मध्ये विकसित भारत व विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने गणरायाचे आशीर्वाद मिळो. तसेच भारत हा जगातील शक्तिशाली देश व्हावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक भाविकाला श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या गेल्या. मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. ३० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कार्यक्रमयंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाटयपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.













