शिष्यवृत्ती मार्गदर्शिकेचे रावेत शाळेत वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेचा अभ्यास भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा रावेत क्र. ९७ शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. अशा स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार साहित्य देखील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध असणे आवश्यक असते. ही गरज ओळखून रावेत शाळेतील आठवीच्या व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहगामी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार यांनी तसेच त्यांच्या सहकारी रेणूका दिक्षीत,भारती गामी व मधूरा देशपांडे यांच्या मदतीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका तसेच NMMS परीक्षेचे मार्गदर्शक व सराव पुस्तिका उपलब्ध करून आज दि. १५/०७/२०२४ रोजी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत साठे यांनी पुस्तकांचे महत्त्व आणि स्पर्धा परीक्षा यावर मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षिका चारुशीला जाधव व इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका शुभांगी गावडे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सरावाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेतील सर्व सहकारी शिक्षक रूपाली कड, सुचिता असोदे, सोनाली ढुमणे, दीपाली शिंपी, निशा शिंदे सुखदेव वीर, शशी चौधरी हे सर्व शिक्षक तसेच बहुसंख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग घुगे यांनी केले.*













