शहरातील राजकीय समीकरण बदणार ; माजी आमदारासह नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत…. ते नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला

अजितदादांना सांगून ते नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत
शरद पवारांना भेटण्यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवारांना भेटले होते. महायुतीत एक बेसिक फॉर्म्युला ठरलाय, ज्यांचे विद्यमान आमदार असतील ती विधानसभा त्याच पक्षाच्या वाट्याला येणार. त्यानुसार भोसरी विधानसभा ही भाजपला सुटणार आहे, हे उघड आहे. अजित पवारांच्या गटाकडून शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे स्वतः इच्छूक आहेत.
अजित गव्हाणेंनी लढण्यास असमर्थता दर्शवल्यास माजी आमदार विलास लांडे लढण्याच्या तयारीत आहेत. हे पाहता आमचं काय होणार? आम्हाला विधानसभा लढायची आहे? मग आम्ही कोणत्या चिन्हावर लढायची? असे प्रश्न अजित पवारांसमोर भोसरी विधानसभेतील शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. साहजिकच या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांकडे नव्हती. हे पाहून आम्ही शरद पवारांना भेटायला जातोय, असा निरोप देऊन हे सगळे त्याचदिवशी म्हणजे काल संध्याकाळी शरद पवारांना भेटायला गेले. आपण शरद पवारांना भेटलोय, याची कुणकुण अजित पवारांना कुठून ना कुठून लागणार, याची संबंधित नगरसेवकांना खात्री होती. त्यापासून अजित पवार याबाबत अनभिज्ञ नसावेत, म्हणून या सर्वांनी अजित पवारांच्या कानावर ही बाब टाकल्याचे यातील एका माजी नगरसेवकाने सांगितले.
शरद पवारांना भेटलेले अजित पवार गटातील माजी नगरसेवक कोण? अजित गव्हाणे – शहराध्यक्ष, अजित पवार गट, विक्रांत लांडे – माजी नगरसेवक ( माजी आमदार विलास लांडेंचे पुत्र), पंकज भालेकर – माजी नगरसेवक, समीर मासुळकर – माजी नगरसेवक, संजय वाबळे – माजी नगरसेवक, राहुल भोसले – माजी नगरसेवक, विनया तापकीर – माजी नगरसेविका, वैशाली घोडेकर – माजी नगरसेविका.













