शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वासुदेवाच्या माध्यमातून मतदान जनजागृती

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान..,एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान..,लोकशाहीचा करूया सन्मान..,१०० टक्के करायचं मतदान..हा वासुदेवाचा आवाज सकाळी सकाळी काळेवाडी, तापकीर चौक, रहाटणी परिसरात घुमला आणि या आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत काळेवाडी, तापकीर चौक, रहाटणी परिसरातील उद्याने, सोसायट्यांमध्ये महाराष्ट्राची प्राचीन परंपरा असलेल्या वासुदेवाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि मधुर वाणीने मतदान जनजागृती करणाऱ्या वासुदेवाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली होती.
शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना मतदान करण्याची प्रेरणा देण्यासाठी लोकगीतांच्या सहाय्याने वासुदेवांनी यावेळी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडला. या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.













