ताज्या घडामोडीपिंपरी

विधानसभा निवडणूकीआधी रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका घ्या -शिवसेना (ठाकरे गट) चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांची मागणी

Spread the love

निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीसाठी तत्परता दाखवावी..
शिवसेना (ठाकरे गट) चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांची मागणी…

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची दखल सत्ताधारी राजकीय नेतृत्वांना घ्यावी वाटत नाही, हे समाजासाठी घातक आहे. हुकूमशाहीला पोषक असे वातावरण यातून निर्माण होत आहे. प्रशासकीय राजवटीत सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत. निवडणूक आयोग देखील महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे धाडस करत नाही. दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका वेळेत होतात; राज्याच्या विधानसभा निवडणूका घ्यायचीही तत्परता दिसते. तशी वातावरण निर्मितीही केली जाते. मग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत घोडं कुठ अडलय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळण्याचं पाप कुणाचं? हे जनतेने ओळखून त्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाने काही काळासाठी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी आणि महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, पिंपरी चिंचवड महापालिकांसह राज्यातील २९ महानगरपालिका, ३८५ पैकी २५७ नगरपालिका, नगरपंचायती, ३४ पैकी २६ जिल्हा परिषदा आणि ३५१ पैकी २८९ पंचायत समित्यांवर प्रशासकराज आहे. उर्वरित ठिकाणच्या निवडणुका वर्ष-दीड वर्षावर आल्या आहेत. प्रशासकीय कारभारावर कोणाचाही वचक नाही. तसेच त्यांच्याविरोधात कुठे दादही मागता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे मरण होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा वंचितांना बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. प्रलंबित महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे धाडस निवडणूक आयोगाने दाखवावे.
लोकसभेला एवढा फटका बसूनसुध्दा सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाणावर येत नाही. कार्यकर्ताच स्थानिक पातळीवर सक्षम नसेल तर, खाली पक्ष वाढीसाठी काम कोण करणार? कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी आणि लोकांचे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तत्परता दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका काही काळ पुढे ढकलाव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रयत्न करावेत, असे या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे.

” महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्रभाग रचना, आरक्षण आणि निवडणुकीची तारीखही जाहीर झाली होती. त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात आले. सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ते वेळेत घेतात. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या जात आहेत. भाजपकडून प्रशासकीय राजवटीचा फायदा केवळ स्वार्थासाठी होत आहे? की नगरसेवकांवर होणारा प्रशासकीय खर्च वाचविण्यासाठीचा हा नुसता खाटाटोप आहे? हे एकदाचे तरी जाहीर करावे.”
– मा. संतोष सौंदणकर, शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर संघटक – चिंचवड विधानसभा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button