वारकरी शिक्षण संस्थेसाठी पाच कोटींचा निधी देणार :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीत बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे कार्य जोग महाराज संस्थांपित वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे आळंदीत येथील संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकां पर्यंत दिला जातो.संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत देण्याचे कार्य केले जाते. सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथील वसतिगृहाचे लोकार्पण दिनी व्यक्त केले.
वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेस यापूर्वी ६ कोटी निधी जाहीर झाला होता. त्यातील पाहिल्याटप्प्यात १कोटी देण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशो ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण प्रसंगी त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ताल मजल्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ह.भ.प.मारोतीबाबा कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, संतोष महाराज सुले पाटील, खजिनदार भालचंद्र नलावडे, माजी आमदार योगेश मुळीक, तुकाराम महाराज मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळाराम मंदीर, नाशिक दौऱ्यावर असतांना वारकरी शिक्षण संस्थचे विद्यार्थ्यां यांचे सोबत भजन साधना येथील साधकांनी केली होती. अशा सर्व विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, साधक, नागरिक उपस्थित होते.
बंकटस्वामी सदनात राज्यभरातील विद्यार्थ्यांची सोय
विद्यार्थी वस्तीगृह दोन मजली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७४.४० चौरस मीटर आहे. एकूण २० खोल्याचे स्वच्छतागृह बांधकाम आहे. या वसतीगृहासाठी शासनाने १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून तळ मजल्यावरील एकूण १० खोल्याचे तर संस्थेच्या निधीतून पहिल्या मजल्यावरील एकूण १० खोल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेत राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली आहे.













