“लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपले; अजितदादा पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा” – आमदार महेश लांडगे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून महाराष्ट्राने एक धडाडीचे, लोकाभिमुख आणि करारी नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आमदार महेश किसनराव लांडगे यांनी व्यक्त केली.
आमदार लांडगे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादांसारखा प्रचंड कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. पहाटे सहा वाजेपासून जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या जाण्याने एक प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपले आहे.”
राज्याच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, असे सांगत आमदार लांडगे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. दादांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्ते आणि जनतेसाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी नमूद केले.
“या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, परमेश्वराने त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी,” अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















