लोकसभा मतमोजणीच्या दिवशी असणाऱ्या विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा मतमोजणीच्या दिवशी असणाऱ्या विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि एन.एस.यु.आय.ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एलएलबी या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या शेवट सत्राच्या परीक्षेचा पहिला पेपर दि.०४ जून २०२४ रोजी होत आहे; परंतु सदर दिवशी देशातील अठरावी लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी असल्याने या कामकाजासाठी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, पदाधिकारी यांची नेमणूक असणार आहे.
असे अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी जे एलएलबी सोबतच इतर अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत आहे अशा बहुतांशी अधिकारी व कर्मचारी यांची दि. ०४ जून २०२४ रोजी मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक असण्याची शक्यता आहे. तसेच सदरची होऊ घातलेली ही निवडणूक देशातील तरुणांनी हाती घेतलेली असल्याने तरुणांसोबतच सामाजिक व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बांधव हेदेखील मतमोजणीच्या दिवशी व्यस्त असण्याची शक्यता आहे. म्हणून विधी आणि इतर ज्या कोणत्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ०४/०६/२०२४ रोजी असणारा पेपर पुढे ढकलण्यात यावा अथवा अशा निवडणूक कर्तव्यार्थ ज्या कर्मचा-यांच्या नेमणुका आहेत आणि जे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची सदर दिवशी परीक्षा आहे यांचेसाठी अन्य दिवशी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी संयुक्तिक मागणी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आणि महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय.) वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर यांनी सदर मागणीचा सकारात्मक विचार करून कोणाचेही नुकसान होणार नाही या दृष्टीने लवकरच विद्यापीठामार्फत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. धनंजय कोकणे आणि महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स
बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. उमेश खंदारे, एनएसयुआयचे सोशल मीडिया प्रमुख अभिजित हळदेकर, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, प्रदेश प्रवक्ता अविनाश सोळुंके, पुणे जिल्हा सरचिटणीस महेश कांबळे, कृष्णा साठे आदी उपस्थित होते.













