ताज्या घडामोडीपिंपरी

“राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो!” – डॉ. संजय उपाध्ये

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “राष्ट्र प्रथम या संकल्पनेतून भारत विश्वगुरू होऊ शकतो!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या प्रवचन मालिकेंतर्गत ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर निरूपण करताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. यावेळी ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी, रविकांत कळंबकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “१९४७ ते एके ४७ अशी भारताची सामाजिक आणि ‘दिल एक मंदिर हैं’ ते ‘दिल तो पागल हैं’ अशीही सांस्कृतिक वाटचाल सुरू होती; परंतु दहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खूप सुधारली आहे, हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मान्य करावे लागेल. अर्थात भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी नेत्यापेक्षाही जनतेचा सहभाग जास्त महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये ‘यथा प्रजा तथा राजा’ हे तत्त्व मूलभूत असते. त्यामुळे देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी नागरिकांना स्वतःमध्ये कणाकणाने बदल करावे लागतील. विश्वगुरू होण्याची प्रक्रिया व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र या क्रमाने कार्यान्वित होत असते. त्यामुळे आपले आचरण विश्वनागरिकासारखे असायला हवे. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण करताना दातृत्व, राष्ट्रवाद, शिष्टाचार, विजिगीषूवृत्ती या गुणांचा अंगीकार करावा लागेल. ज्ञानेश्वर माउलींच्या ‘हे विश्वचि माझे घर…’ या वचनाचे पालन करावे लागेल. वनवासाहून परत आल्यानंतर अयोध्या भूमीचे दर्शन झाल्यावर श्रीरामाने ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी!” असे उद्गार काढले होते. अर्थात मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे, ही भावना जोपर्यंत आपल्या अंतःकरणात रुजत नाही, तोपर्यंत भारत विश्वगुरू होऊ शकत नाही!” संतवचने, कविता, आंतरराष्ट्रीय संदर्भ उद्धृत करीत उपाध्ये यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीतून विषयाची मांडणी करताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तीन वर्षांपासून खंडित झालेली प्रवचनमालिका पुन्हा सुरू झाल्यामुळे श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. प्रवचनानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.
महेश गावडे, सुभाष चव्हाण, बंडू भोकरे, संदीप जंगम, गोपी बाफना, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button