राष्ट्रसेवेची आणि ग्रामसेवेची प्रेरणा देणारा उपक्रम – डॉ. अशोककुमार पगारिया

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक’ या ब्रीद वाक्याला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर कोहिनकरवाडी तालुका खेड येथे संपन्न होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यवहार हा प्रत्येक व्यक्तीला डिजिटल माध्यमातून करता आला पाहिजे, मग ते वाचन असो, एखादे तिकीट बुक करणे असो अथवा एखादा आर्थिक व्यवहार करणे असो. फक्त युवकांनी स्वतः पुरते डिजिटल ज्ञान अवगत करून थांबू नये तर समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या परीने डिजिटल- संगणक साक्षरता शिकवावी म्हणून ‘राष्ट्रीय सेवा योजना : राष्ट्रसेवेची आणि ग्रामसेवेची प्रेरणा देणारी शिबीरे आहेत’ असे मत भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक मा. अविनाश कोहिनकर, कोहिनकरवाडी गावचे सरपंच मा. पंढरीनाथ कोहिनकर,मा.डॉ.कैलास कोहिनकर, माजी सरपंच मा.वैशालीताई कोहिनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सदाशिव कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे सह समन्वयक प्रा. महालक्ष्मी शिरसाठ व माजी विद्यार्थिनी संघटना प्रमुख अदिती नीटूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. अविनाश कोहिनकर यांनी बदलत्या जीवनशैलीत व भौतिक साधनसामुग्रीच्या विळख्यात युवकांनी न अडकता शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी श्रम केल्याशिवाय मार्ग नाही. मग ते श्रम शारीरिक असो किंवा बौद्धिक. कामाची प्रतवारी न ठराविता परिस्थितीनुरूप जीवनाच्या मार्गावरून अडचणींना तोंड देत ध्येय गाठणे हाच यशस्वी जीवनाचा मार्ग आहे असे मत व्यक्त केले.
मा.डॉ.कैलास कोहिनकर यांनी यांत्रिकीकरणामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजार वाढले असून सद्यस्थितीत शहरीकरणामुळे, कारखानदारीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. यासाठी पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराला अनुसरून खेड्याकडे चला या विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. मात्र खेड्यांनी देखील आपले रूप बदलले आहे. त्यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्याची काळाची गरज आहे. निसर्गाचे संवर्धन केले नाही तर निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. यासाठी प्रत्येक गोष्टीचा शास्त्रशुद्ध अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. सद्सदविवेकबुद्धीला स्मरून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव स्वतः करून घ्यावी. स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांचे समाजाचे जीवन जगणं सुसह्य होईल याचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी सरपंच वैशालीताई कोहिनकर यांनी आमच्याकडून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचणी येणार नाही. गेल्या तीन चार वर्षाचा ऋणानुबंध असाच ठेवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी विद्यार्थिनी संघटना प्रमुख अदिती नीटूरे यांनी मी एक राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर योजनेची विद्यार्थिनी असल्यामुळे बोलू शकते हे सर्व श्रेय राष्ट्रीय सेवा योजनेला जाते अशी भावना व्यक्त केली.
प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विशेष हिवाळी शिबिराच्या उद्घाटनाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयात वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन राष्ट्रीय सेवा योजना हा आमच्या महाविद्यालयातील एक कृतिशील उपक्रम आहे. या उपक्रमामुळे समाजामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते . अशी भावना व्यक्त केली.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मा. सुधाकर बैसाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराची आठवडाभर चालणाऱ्या कामकाजाची माहिती देऊन गेल्या तीन वर्षांमध्ये गावामध्ये केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेतला व यावर्षी गावाने आम्हाला कॅम्पसाठी बोलाविल्याबद्दल गावाला धन्यवाद दिले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. पंढरीनाथ कोहिनकर यांनी, आमचा आणि या विशेष हिवाळी शिबिराचा ऋणानुबंध गेली तीन वर्ष दृढ झाला असून काळानुरूप बदलत्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या विषयाला अनुसरून संगणक साक्षरता, डिजिटल स्वरूपातील ज्ञान, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. श्रमाच्या माध्यमातून डोंगराळ भागात वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्याचे काम हाती घेऊन श्रमसंस्काराचा हा वारसा आपण पुढे असाच चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख विभा ब्राह्मणकर यांनी केले व आभार राष्ट्रीय सेवा योजना सहसमन्वयक प्रा. महालक्ष्मी शिरसाठ यांनी मांनले.
या उद्घाटन समारंभास विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. सचिन पवार, नॅक समन्वयक डॉ. हनुमंत शिंदे, परीक्षा अधिकारी डॉ. विजय निकम, वाणिज्य विभाग प्रमुख विभा ब्राह्मणकर, ग्रंथपाल राजेश कुंभार , गावातील गावकरी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














