शिवाजीराव आढळराव पाटील यांची अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांची अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात डाव टाकला आहे. शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे.
या बाबतची घोषणा आज सकाळी दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत केल्याची माहिती मिळत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट बोलूनच दाखवलं. त्यामुळे आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. महायुतीकडून शिरूर मतदारसंघ अजित पवारांना सोडण्यात आला. शिरूरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळराव पाटलांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांविरोधात विजय मिळवला होता. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाचा हात होता. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलूनही दाखवलं. अशात आता यावेळी या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडेच राज्याचं लक्ष लागलं आहे.













