राज्यात कारखानदारी वाढविण्यासाठी प्रयत्न झाले तरच उद्योगात महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारा ठरेल – शरद पवार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात कारखानदारी वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे काम केल्यास उद्योगात महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने शनिवारी (दि.२०) पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे, खासदार अमोल कोल्हे, माजी गृह राज्यमंत्री किन्हाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, छोटी- छोटी गावे मिळून निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये टेल्को, बजाज ऑटो, बजाज टेम्पो हे उद्योग आल्याने पाठोपाठ अनेक शेकडो वेगवेगळे उद्योग आले. त्यातून औद्योगिक क्रांती झाल्याने हाताला काम मिळाले. त्यासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंत चव्हाण हे आग्रही होते.
आज पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. हजारो हातांना काम मिळाले. लोकसंख्या वाढत गेली म्हणून हिंजवडीत आयटी पार्क आणले. आज लाखों तरुणांना रोजगार मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात स्थानिकांचे योगदान फार महत्त्वाचा आहे. स्थानिकांनी जागा दिल्या, मानसिकता ठेवली म्हणूनच आज ही औद्योगिक नगरी नावारूपाला आली. आता ही प्रगती थांबवायची नाही. नवनवीन उद्योगधंदे येथे आणायचे आहेत. मला खात्री आहे की, देशातच नव्हे तर देशाबाहेरही उद्योगाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवडचा परिसर एक वेगळी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट हवी, नक्कीच आपण इतिहास घडवू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
खा. पवार यांना सोडून पक्षाच्या सर्वच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सडेतोड वक्तव्य करीत, भाजपवर सडकून टीका केली; मात्र शरद पवार यांनी राजकीय भाषण टाळत, पिंपरी-चिंचवड शहरासाठी तसेच, राज्यासाठी उद्योगधंदे व कारखाने अत्यावश्यक असल्याचा मुद्दा मांडला.













