ताज्या घडामोडीपिंपरी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध बँकांसोबत सोयीसुविधांबाबत बैठक

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्यात आलेली आर्थिक लाभाची रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करण्यात येऊ नये, तसेच आधार कार्ड बँकेशी संलग्न नसल्यास विशेष मोहीम राबवून यासंदर्भात कामकाज लवकरात लवकर पूर्ण करावे, आणि लाभार्थ्यांचे प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्यामुळे बंद असलेले बँक खाते तत्काळ सुरु करण्यात यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्ट २०२४ महिन्याची एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहे. परंतु काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही. याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हा मध्यवर्ती बँकेसमवेत बैठक घेण्यात आली, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे तसेच इंडसइंड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया, एलडीएम आदी बँकेचे व्यवस्थापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँकेशी आधार संलग्न ( आधार सीडेड) नसलेल्या लाभार्थी महिलांची यादी बँक निहाय शेअर करण्यात आली आहे. बँकेशी आधार संलग्न नसल्यामुळे बऱ्याच लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झालेली नाही, अशा महिलांना संपर्क करून उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून या मोहिमेच्या माध्यमातून बँकेशी आधार संलग्न करण्याचे कामकाज पूर्ण करण्यात येईल.

या योजनेच्या लाभार्थी महिलांचे बँकेचे खाते प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्यामुळे बंद करण्यात आले असतील तर सदर बँक खाते तत्काळ सुरु करून लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक लाभाची रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी तसेच बँकेकडून कोणत्याही प्रकारची रक्कम या योजनेच्या रकमेतून वजा करण्यात येऊ नये अशा महाराष्ट्र शासनाने सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या उद्देशाने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असलेली रक्कम ही या महिलांसाठी असून, कोणत्याही प्रकारच्या थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजनासाठी याचा वापर करण्यात येऊ नये, तसेच ही रक्कम काढण्यासाठी कोणत्याही बँकेने थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास लाभार्थी महिलांना नकार देऊ नये, याबाबत काही अडचणी असल्यास तत्काळ वरिष्ठांसोबत चर्चा करून अडचणींवर तोडगा काढावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी बैठकीत बोलताना दिल्या. याबाबत बँकेच्या प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत शासन निर्णयाचे पालन करण्यात येईल असे सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button