मावळ लोकसभा निवडणूकीसाठी १२ मे रोजी मतदान साहित्य वितरण प्रक्रिया पार पडणार – दिपक सिंगला यांची माहिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून दि. १२ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय विविध निवडणूक प्रक्रिया राबविल्या जात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तसेच मतदान साहित्य वितरण व स्विकृतीसाठी सूक्ष्म नियोजन देखील करण्यात आले आहे. केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहने आणि इतर व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रे लागणार आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए.आर कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणाहून होणार आहे. तर कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात येणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून होणार आहे. तसेच मावळ विधानसभा मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनीअरिंग कॉलेज या ठिकाणाहून होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ५४९ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून करण्यात येणार आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ४०० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर ऍन्ड रिसर्च सेंटर या ठिकाणाहून होणार आहे.
दि. १२ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाईल. साहित्य वितरणाच्या ठिकाणी साहित्य वाटपासाठी मतदान केंद्रनिहाय टेबल तयार करण्यात येणार आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येईल. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेतली जाईल. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात येतील. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी स्वतंत्र कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या ६ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून जीपीएस प्रणालीदेखील बसवली जाणार आहे.
प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्याकामी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करावी, नियोजित मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्य वितरण करताना योग्य समन्वय ठेवून मतदान साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर सुस्थितीत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, तसेच निवडणूक मतदान कामकाजासाठी नेमणूक करण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम पार पाडावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.













