मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य, पर्यटन, क्रीडा, पाणीपुरवठा आणि महामार्ग विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
आरोग्य सुविधांसाठी तत्काळ निधी मंजूर
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, लोणावळा उपजिल्हा रुग्णालयातील फर्निचर, मेडिकल उपकरणे, गॅस पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुविधांसाठी पुरवणी मागणीत समावेश करून तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आई एकविरा देवीसाठी फनिक्युलर रोप वे आणि विकासकामांना मंजुरी
पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिर परिसरातील सुविधांसाठी फनिक्युलर रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मंदिर आणि परिसराच्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी
मौजे जांभूळ येथे तालुका क्रीडा संकुलासाठी ७ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या संकुलात आधुनिक ट्रॅक, कबड्डी आणि व्हॉलीबॉल मैदानाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
पाणीपुरवठा योजनांना गती; निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे आदेश
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला गेला.
– खडकाळे, पाटणसह आठ गावे, डोंगरगाव-कुसगाव आणि डोणे-आढले या योजनांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
– कार्ला प्रादेशिक योजना मे अखेर आणि वराळे योजना जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
– वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
देहू पाणीपुरवठा योजनेला गती
देहू शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याच्या सूचना प्रधान सचिवांना देण्यात आल्या.
महामार्ग आणि उड्डाणपूल प्रकल्पांवर विशेष भर
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याबाबत चर्चा झाली.
– कार्ला आणि वडगाव फाटा येथे उड्डाणपुलांसाठी प्रस्ताव सादर झाले असून, तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
– उर्वरित उड्डाणपूल प्रकल्प आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे थेट पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
——- चौकट —–
निधीअभावी कोणतेही काम थांबणार नाही – पवार
या बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, निधीअभावी कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प थांबणार नाहीत, असे स्पष्ट केले.













