महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यात स्त्री जीवनावर आधारीत सुरेल मैफिल रंगली

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ‘तप्त ग्रीष्मात गुलमोहरासम फुलणारी तर पहाटेच्या शीतल प्रसन्न दवात प्राजक्तासम दरवळणारी, हिमालयानही ज्या पुढे नतमस्तक व्हावं, जिथे प्रौढत्वही शिशु होऊन रांगतं, ती एक समुद्र जिथे साऱ्यांच्या वेदना विश्रांत पावतात, ती एक साठवण वात्सल्याची जी कधीही संपत नाही, ती एक दिलासा आपण एकाकी नसल्याचा, मधुर भाषणी काव्य तेजोमय करणारी, ती प्रेयसी, ती माता आयुष्यातील सर्वच भूमिका समरसतेने जगणारी , पुन्हा पुन्हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नव्याने भेटत हेच सांगते की, “एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवीन जन्मेन मी”’ अशा स्त्री जीवनातील विविध भूमिकांवर प्रकाश टाकणार्या सुरेल मैफिलीने ‘श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर व श्रीमंगलमूर्ती वाडा येथे, 29 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता “ फिरुनी नवी जन्मेन मी” या स्त्री जीवनाला समर्पित मराठी भावगीतांच्या सुरेल मैफिलीने करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, राजेश उमप, देवराज डहाळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक आणि रसिक श्रोते उपस्थित होते.
या मैफिलीत भारतीय विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये स्त्री जीवनात येणाऱ्या आनंदाच्या, सुखाच्या आणि आव्हानांच्या क्षणातील स्त्रियांची भूमिका विषद करणारे मनोरंजक आणि तेवढेच भावनिक क्षण सुरेल गायनाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांसमोर सहभागी कलाकारांनी उभे केले. मुलीचा जन्म, बालपण, बहिण भावाचे नाते, आई मुलगी-वडील मुलगी यांचे नाते, तारुण्य, लग्न, पती पत्नी यांचे नाते, संसारात तिची भूमिका अशा विविध टप्प्यावरच्या “ती” ला, आपल्या सुरेल गायनाने कलाकारांनी रसिक श्रोत्यांसमोर उलगडले.
“फिरुनी नवी जन्मेन मी” या कार्यक्रमात राधिका अत्रे यांनी आपल्या सुरांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली तर पल्लवी आनदेव यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. राजेश्वरी पवार यांनी आपल्या आवाजाने रसिक श्रोत्यांच्या मनावर भुरळ घातली. आशिष देशमुख यांनी कार्यक्रमात रंगत भरली, प्रसन्न बाम,विवेक परांजपे, अभय इंगळे, अमित कुंटे, शैलेश देशपांडे या वाद्यवृन्दांनी सातसांगत केली. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना धनंजय पुरकर यांची आहे.
तत्पूर्वी अपर्णा कुलकर्णी यांचे “क्रांतिवीर चाफेकर बंधू” या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान पार पडले.













