महाविकास आघाडीच्या उमेदवारांच काम करणार नाही शिवसैनिक आक्रमक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाला जागा सुटल्याने उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक नाराज झाले आहेत. शिवसैनिकांनी बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा ठराव केला आहे. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा डाव केला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी केला आहे. पिंपरी- चिंचवड मधील आकुर्डी येथील सेना भवन येथे ही बैठक पार पडली. महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.
नुकतीच शरद पवार यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. यादीत पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी सुलक्षणा शीलवंत- धर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह माजी आमदार गौतम चाबुकस्वार इच्छुक होते. याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट देखील घेतली होती. अखेर महाविकास आघाडीतील जागावाटप झाल्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या पक्षाला गेला. नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आज आकुर्डीत सेना भवन या ठिकाणी बैठक घेतली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच आम्ही काम करणार नाहीत. असा ठराव या बैठकीत करण्यात आला. महाविकास आघाडीचा उमेदवार दिला असला तरी आम्ही देखील या मतदार संघातून लढणार असल्याचं स्पष्ट शिवसैनिकांनी सांगितलं. तिन्ही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अपक्ष उमेदवारी घेऊन बंडखोरी करणार आहेत. इच्छुक निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा पेच पक्षश्रेष्ठी सोडवणार का? हे पाहावं लागणार आहे.













