ताज्या घडामोडीपिंपरी

महापुरुषांचे कल्याणकारी वैचारिक सामर्थ्य स्वीकारणे काळाची गरज परिसंवादातील सूत्र : मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापुरुषांना काळाच्या परिप्रेक्षात पाहावे लागते, त्यातूनच त्यांच्या विचारांचे सूत्र समजते. महापुरुषांच्या विचारांमध्ये मतभेद होते तरी त्यांची भूमिका संवादी होती. लोकमान्य ते लोकशाहीर या प्रवासात जनजागृती, सामाजिक व्यवस्था, राष्ट्रीय विचारांचाच जागर केला गेला. महापुरुषांना जाती-पातीत विभागणे म्हणजे राष्ट्रीय पाप आहे. त्यांच्या विचारांमधील मर्यादा वजा करून त्यांचे कल्याणकारी वैचारिक सामर्थ्य स्वीकारावे, असा सूर परिसंवादात उमटला.

मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‌‘टिळक, आगरकर, अण्णा भाऊ साठे यांच्या संवादी भूमिकांची बेरीज‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, रानडे इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे व्यासपीठावर होते. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रम झाला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वैचारिक पैलू उलगडताना दादा इदाते म्हणाले, टिळक स्वातंत्र्याच्या प्रेरणाशक्तीचा प्रमुख स्रोत होते. पारतंत्र्याची सवय झालेल्या समाजकाळात टिळकांनी स्वातंत्र्याची भूमिका मांडली. इंग्रजांनी सुरू केलेल्या धार्मिक-जातीकलहाच्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी टिळकांचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताची घटना तयार होण्याआधीच टिळकांनी 1895 साली घटनेचा 111 कलमी मसुदा मांडला होता, ज्यात लेखन-वाचन-धार्मिक स्वातंत्र्य अशा मुलभूत तत्त्वांची मांडणी होती. समाजप्रबोधनासाठी टिळकांनी विविध उपक्रमांमधून स्वातंत्र्याचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.
सम्राट फडणीस म्हणाले, आजच्या काळात संवादी भूमिका-एकसूत्रता शोधणे किचकट आहे, कारण या काळात संवाद होणेच अवघड आहे आणि झाल्यास तो कोरडा आहे. आज आपण वजाबाकीचे आयुष्यच जगत आहोत, नकारात्मकता शोधत आहोत. इतिहासाशी जोडले जात असताना महापुरुषांच्या विचारांची बेरीज हा विषय मोलाचा ठरतो. टिळक, आगरकर, गांधी, आंबेडकर, साठे या महापुरुषांच्या विचारात देशाची सुधारणा हा एकच उद्देश होता. हे महापुरुष समाजाला दिशा दाखविणारे समाजसुधारक होते.

राष्ट्रीय शिक्षणाची भूमिका टिळक व आगरकर यांनी मांडली होती असे सांगून डॉ. संजय तांबट म्हणाले, लोकजागृती करून राष्ट्रीय विचार समाजापर्यंत नेत जनमत संघटन करण्याकडे महापुरुषांचा ओढा होता. त्यांच्यातील वैचारिक मतभेद हे राष्ट्रीय-सामाजिक मतमतांतराचे द्योतक होते. समाजसुधारक चार भिंतीच्या शाळेत नव्हे तर समाजाच्या शाळेत शिकले. टिळक-आगरकर-साठे यांच्या साहित्यातून लोकांची अपेक्षा, त्यांची भाषा, जगण्याची पद्धत, समाजातील दु:ख आणि त्यावरील उपाय हे विषय मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, महापुरुषांच्या विचारांमध्ये मतभेद होते; परंतु मानवी कल्याण हेच त्यांचे ध्येय होते. मशत्रुत्वानेहापुरुषांच्या कल्याणकारी विचारांच्या सामर्थ्याची बेरीज करून त्यांनी दाखविलेले शहाणपण एकत्र करणे आजच्या काळात गरजेचे आहे. आजचे राजकारण-समाजकारण शत्रुत्वाने माखलेले आहे; परंतु समाजाचे कधीच भले होत नाही. संघर्ष आणि संघर्षातून संवाद हे कल्याणकारी विचारांचे सूत्र आहे.

प्रास्ताविकात डॉ. धनंजय भिसे यांनी अभिजन-बहुजन हा भेद मिटवून समाजाला पुढे नेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे . सूत्रसंचालन प्रा. मोहन शिंदे यांनी केले.तर दादाभाऊ आल्हाट यांनी मांडले. यावेळी कार्यक्रमाला निलेशजी गद्रे,डॉ.संदिप सांगळे,डॉ.संतोष रोडे,प्रा.रत्नदीप कांबळे,अशोक लोखंडे,मारुती वाडेकर,अथर्व इदाते,नंदा साळवे,सचिन साठ्ये,सुहास देशपांडे,श्रीनिवास राहळकर,भास्कर केळकर,अनिल भस्मे,डॉ.विनायक पवार,भास्कर नेटके,प्रसाद खंडागळे,संपत जाधव,विजय भिसे,उज्ज्वला हातागळे,मारुती पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button