भोसरी मतदार संघात ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’ प्रभावीपणे राबवणार!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील महायुती सरकारने घोषणा केलेल्या ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’’ योजनेची भोसरी विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन, तहसीलदार कार्यालय, महावितरण कार्यालय आणि लोकप्रतिनिधी असे एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’ राबवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, क- क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, ई- क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे आणि फ- क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर आदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील एकूण १२ प्रभागातील महापालिका शाळा, महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय, कर संकलन झोन ऑफीस, क्षेत्रीय कार्यालय अशा प्रकारे प्रत्येक प्रभागामध्ये किमान ८ ते १० केंद्रांवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. ज्यामुळे त्या-त्या परिसरातील महिला- माता भगिनींना या योजनेचा लाभ सुलभपणे मिळेल, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून तळागाळातील घटकांच्या विकासाचा विचार केला जातो. माता-भगिनींना प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये मिळतील, अशी ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’ भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये सक्षमपणे राबवण्याची तयारी केली आहे. मतदार संघातील जास्तीत-जास्त लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचा संकल्प आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच, अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. काही तक्रारी, समस्या व आपल्या परिसरातील केंद्राच्या माहितीसाठी अर्जदारांनी परिवर्तन हेल्पलाईन – 93 79 90 90 90 वर संपर्क करावा, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.




















