Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे हे 63 हजार 634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला. लांडगे यांच्या विजयानिमित्त भोसरी परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे. तसेच महेश लांडगे यांच्या भोसरी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या फेरीचा निकाल हातात येण्यास पावणे अकरा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग संथ होता. मात्र, नंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतमोजणी केंद्रावर पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.

पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. लांडगे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. तीन वाजेपर्यंत मतमोजणीच्या 23 फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच महेश लांडगे आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर अजित गव्हाणे होते. लांडगे यांना 2 लाख 21 हजार 578 मते मिळाली. त्यांचा 63 हजार 634 मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version