ताज्या घडामोडीपिंपरी

भीमाशंकर कॉलनीतील रस्त्याचे काम धिम्या गतीने, रहिवासी वैतागले शाम जगताप यांची प्रशासनाच्या धिम्या कामावर तीव्र नाराजी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेलीच आहेत. भीमाशंकर कॉलनीतील रस्त्याच्या कामाला मोठा गाजावाजा करीत सुरुवात झाली. मात्र, गेले तीन महिने नागरिक फक्त मनस्ताप सहन करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे कामाला गती देऊन रहिवास्यांची गैरसोयीतून सुटका करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर युवक कार्याध्यक्ष शाम जगताप यांनी केली आहे.

पिंपळे गुरवमधील काही भागातील कामे जलदगतीने झाली आहेत. तर भीमाशंकर कॉलनी, मोरया पार्क आदी भागातील कामे धिम्या गतीने सुरू आहेत. या गल्ल्यांमध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पाणी रस्त्यावर साठून राहते. अवकाळी पावसामुळेही या ठिकाणी पाणी रस्त्यावर साठून राहिले होते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महापालिका प्रशासनाने भीमाशंकर कॉलनीतील रस्ता खोदून ठेवल्याने खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रहिवास्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता खोदल्याने लोकांना आपल्या गाड्या मुख्य रस्त्यावर पार्क कराव्या लागत असल्याने सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. अक्षरशः नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. ड्रेनेज लाईन, पावसाळी पाण्याच्या लाईन टाकण्यात आलेल्या आहेत, या ठिकाणी कुठेही पाणी साचून राहणार नाही. रस्त्यालगतच्या नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची समस्या सुटणार आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून मोठा गाजावाजा करीत सुरुवात केलेले काम रेंगाळले आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेऊन भीमाशंकर कॉलनीतील कामाला गती द्यावी, अशी मागणीही शाम जगताप यांनी केली आहे.
पिंपळे गुरवमधील भीमाशंकर कॉलनी अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. महापालिका प्रशासनाने खोदाई करून ठेवली आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी वावरायचे कसे ? महापालिकेच्या अनास्थेमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून खड्ड्यात पडले तर जबाबदार कोण ? त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रहिवास्यांची त्रासातून मुक्तता करावी.
– शाम जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button