भक्ती उत्सवा’त मिळाली ईश्वराची अनुभूती – हभप प्रशांत महाराज मोरे
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आयोजित लोकोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भक्ती उत्सवात अभंग, भारुड, भजनांचे श्रवण करताना साक्षात ईश्वरच समोर आल्याची अनुभूती मिळाली. परंपरा जपण्यासाठी, सामाजिक स्थैर्य, सुसंस्कृत समाजासाठी लोकोत्सवासारखे कार्यक्रम झाले पाहिजेत. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराजांचे अकरावी वंशज हभप प्रशांत महाराज मोरे यांनी केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओडिसा दोन्ही राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सव साजरा होत आहे. लोकोत्सवाचे संयोजन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने केले असून तीन दिवसीय लोकोत्सवाचे उद्घाटन प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे गुरुवारी (दि.२० मार्च) मोठ्या उत्साहात झाले. पहिल्या दिवशी भक्ती उत्सव, शुक्रवारी आदिवासी संस्कृतीचा आदिवासी कला उत्सव तर शनिवारी (दि. २२ मार्च) लोक संस्कृतीच्या लोकोत्सवाने समारोप होणार आहे. उद्घाटन समारंभास लोकमान्य हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण जोशी, महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक विभीषण चवरे, संदीप बलखंडे, जान्हवी जानकर, ओडिसा सांस्कृतिक विभागाचे हेमंत मेहता, सुनील निमावत, पंडित कल्याण गायकवाड, जलदिंडीचे राजू भावसार, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुथियान, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालंदे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते. महाराष्ट्र शासनाच्या आणि उडीसा सांस्कृतिक संचनालयाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहरात लोकोत्सव हा कार्यक्रम म्हणजे पिंपरी चिंचवडकरांना ही सांस्कृतिक मेजवानी आहे, असे पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉक्टर देहाचे विकार दूर करतो तर कलाकार मानसिक विकार दूर करतो. त्यामुळे भक्ती उत्सव हा सर्वांना मानसिक ऊर्जा देणारा आहे, असे डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले.
पं. कल्याण गायकवाड यांनी श्रीराम भजनाने भक्ती उत्सवाला प्रारंभ केला. त्यानंतर कार्तिकीने इंद्रायणी काठी देवाची आळंदी, घागर घेऊन… घागर घेऊन.. निघाली आदी रचना सादर केल्या. कौस्तुभ गायकवाड अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर हे भजन सादर केले. भक्ती उत्सवाचे आपल्या ओघवत्या शैलीत हभप अभय नलगे यांनी सूत्रसंचालन केले. पं. कल्याण गायकवाड, कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड यांनी भजन कीर्तन भारुड सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ओडिसी कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चिंचवडे अविनाश आवटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे पाटील, आभार अनिल गालिंदे यांनी मानले.













