ताज्या घडामोडीपिंपरी

बालेवाडी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनाचा  महापालिका स्तरावर  आयुक्त शेखर सिंह यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाच्या दृष्टीने नियोजन करून संबंधित महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी आपसांत योग्य समन्वय ठेऊन सोपवलेली  जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी पुण्यातील  बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने  शासन स्तरावरून  पिंपरी चिंचवड महापालिकेला  आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले असून त्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आढावा बैठक आज घेतली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस  अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, संबंधित विभागप्रमुख, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

बालेवाडी येथे होणाऱ्या लाडकी बहीण योजना लाभ हस्तांतरण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या समन्वयासाठी महापालिकेच्या वतीने नोडल अधिकारी म्हणून उप आयुक्त रविकिरण घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. यानुसार महापालिकेच्या वतीने सुमारे १२३ सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. या सुविधा केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्यात येत असून आतापर्यंत महापालिकेकडे १ लाख ४७ हजार ७५१ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती  समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button