बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू एकवटले पिंपरी चिंचवड येथे विशाल मोर्चा

बांगलादेशातील विकृतींविरोधात वज्रमूठ! सकल हिंदू समाज रस्त्यावर, हिंदूंची जनगर्जना
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या प्रमुख मागणीसाठी चिंचवड येथे सकल हिंदू समाजाने रविवारी विशाल मोर्चा काढला.
सकल हिंदू समाजाच्यावतीने क्रांतिगुरू लहुजी वस्ताद,साळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी साडे दहा वाजता या विराट मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह निगडी, चिखली प्राधिकरण, देहू , आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान/ मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात भगवे मफलर परीधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारत मातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या.
सकल हिंदू समाज आयोजित
हिंदू जनगर्जना मोर्चाच्या प्रमुख मागण्या –
१.बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या सुरू होऊन आजही होत आहेत. भारत सरकारला विनंती आहे की हे थांबविण्यासाठी सक्षम भारत सरकारने हस्तक्षेप करावा.
२. CAA कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी.
३. आपल्या पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत याचे सर्वेक्षण तातडीने करावे. त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. त्यांच्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे. भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. बांगलादेशी मुसलमान घुसखोर
आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून ताबडतोब देशाबाहेर हाकलून देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी ,अशा ३ प्रमुख मागण्या या विशाल मोर्चाद्वारे करण्यात आल्या.
मोर्चा जात असलेल्या मार्गावरून दोन्ही बाजूच्या दुकानदार, व्यावसायिक देखील मोर्चाला उस्फूर्त समर्थन देत होते.
क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड येथून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पोहचला तिथे विश्व हिंदू परिषद केंद्रिय सह मंत्री शंकर गायकर यांनी मोर्चाच्या प्रमुख मागण्या संबंधी माहिती देऊन बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारावर उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या तातडीच्या उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली, तत्पूर्वी पुण्यातील कायदेतज्ञ ऍड.वर्षा डहाळे यांनी बांगलादेश मधील महिलांवर होत असलेले अत्याचार कथित करून सर्वच इस्लामी राजवटीत महिला दुर्लक्षित राहिल्या, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत ही अत्यंत दुःखाची आणि संताप आणणारी बाब आहे असे नमूद केले त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिला व सकल हिंदू समाज समन्वय समितीने प्रशासनाला निवेदनाद्वारे आवाहन केले. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत होता, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चा क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महापुरुषांच्या पुतळ्याला, स्मारकाला अभिवादन करून मोर्चा शिस्तबध्द पद्धतीने पुढे गेला. समारोपस्थानी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
मोर्चामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गावरुन वळवण्यात आली तर काही मार्गावर वाहतुक कासव गतीने पूढे सरकत होती.
बांगलादेशात घडत असलेल्या या विकृत घटना, येथील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध, जैन समाजावर होत असलेले अमानुष हल्ले, अत्याचार या विकृतींविरोधात रविवारी सकल हिंदू समाज, विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन विशाल जनगर्जना मोर्चा काढत सकल हिंदूंच्या एकीची वज्रमूठ भक्कम केली.
——————————————–
*क्षणचित्रे*
* या विशाल मोर्चात बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या झाल्या / होत आहेत हे सर्व त्वरित थांबविण्याकरिता भारत सरकारने हस्तक्षेप करावा ही प्रमुख मागणी करण्यात आली.
* सकल हिंदू समाज समन्वय समितीचे आयोजन
– क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकाला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात मार्गात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन..
– मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज डौलात फडकत होता.
– समारोपस्थानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन
– ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि समारोपात शिववंदना
– मोर्चा अतिशय शिस्तबद्ध व भव्य
* मोर्चात सहभागी पर्यावरणप्रेमींनी केले कचरा व्यवस्थापन, स्वच्छता
* महिलांचा लक्षणीय सहभाग
* पोलिसांचा चोख बंदोबस्त
* मोर्चा नंतर लगेच वाहतूक सुरळीत
– मागण्यांना नागरिकांचा मोठा पाठींबा
* विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय संघटना, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने सहभागी













