प्रभू श्रीराम व्रतस्थ, आदर्श व मानवतावादी जीवनाचे प्रतीक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे ‘अपने अपने राम’ कार्यक्रम
पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “प्रभू श्रीराम केवळ देव नाहीत, तर व्रतस्थ व आदर्श जीवनाचे प्रतीक आहे. अखंड भारतातील हिंदूंचे परम श्रद्धापीठ आहे. राम मंदिर केवळ वास्तू नसून, श्रद्धास्थान आहे. प्रभू रामाच्या आदर्शावर तंतोतंत काम करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवस व्रत केले असून, खऱ्या अर्थाने रामराज्य येण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी आमदार भीमराव तापकीर, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, अभिनेता क्षितिज दाते, रमेश परदेशी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, विनोद सातव, सुभाष नाणेकर, हेमंत रासने, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “वर्षानुवर्ष पत्र्याच्या शेडमध्ये राहिलेले प्रभू श्रीराम अयोध्येत भव्यदिव्य व सुंदर मंदिरात विराजमान होत आहेत. हा आनंदोत्सव आपल्या सर्वांनाच भक्तिरसात न्हाऊ घालत आहे. देशातील वातावरण राममय झाले आहे. रामराज्य येऊ घातले आहे. आपण सर्वांनी एकमेकांना भेटल्यावर राम राम घालायला हवा. डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीत रामकथा ऐकण्याची संधी मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना दिली, याबद्दल त्यांचे कौतुक करतो.”
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून डॉ. कुमार विश्वास यांनी आपल्या रसाळ वाणीने रामकथेच्या भक्तीरसाची अनुभूती दिली आहे. विश्वास यांनी आपल्याला राम सोप्या, कलात्मक व काव्यात्मक पद्धतीने सांगितला. या ऐतिहासिक आनंदोत्सवाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो.”
कविता तिवारी, मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला. तीनशे विजेत्यांना संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अयोध्येला नेण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
*रामकथा परमानंद देणारी साहित्यकृती : डॉ. कुमार विश्वास*
साध्य व साधन सुचिता रामकथेतून शिकायला मिळते. वाईटावर नेहमी चांगल्याचा व सत्याचा विजय होतो, हा रामचरित्राचा सार आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी चांगल्या साधनांचा उपयोग करायला हवा. अन्याय सहन करण्याची मर्यादा किती ठेवायची आणि योग्यवेळी कठीण प्रसंगावर चांगल्या मार्गाने मात कशी करायची, याचा वस्तुपाठ रामकथा आहे. प्रत्येक युगात रावणरूपी एखादी वाईट शक्ती आपल्यावर आक्रमण करत असते. त्यावेळी कोणीतरी, कुठेतरी कौशल्येच्या पोटी राम जन्म घेतो आणि त्या वाईटाचा संहार करतो. रामकथा आपल्याला शिकवते, भावुक करते, वेळप्रसंगी रडवते, राग येण्यास प्रवृत्त करते, पण शेवटी रावणाला म्हणजे वाईट शक्तीला पराभूत करते. ही रामकथा ऐकताना आपल्याला परमानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, असे डॉ. कुमार विश्वास यांनी सांगितले.













