ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक

“प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो!” – एकनाथ आव्हाड

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मुलांच्या तर्कशक्तीला चालना द्या; कारण प्रत्येक मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो!” असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कारविजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले.

रश्मी गुजराथी लिखित ‘आनंदाच्या बिया’ आणि ‘आभाळातील जहाज’ या दोन बालकथासंग्रहांचे प्रकाशन करताना एकनाथ आव्हाड बोलत होते. ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. दिलीप गरुड, बाळकृष्ण बाचल, सीमा गांधी, प्रकाशक निखिल लंभाते आणि लेखिका रश्मी गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकनाथ आव्हाड पुढे म्हणाले की, “आजकाल बालसाहित्यात संख्यात्मक वाढ होताना दिसते; परंतु ती गुणात्मक हवी. बालसाहित्यातून मुलांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या कल्पनाशक्ती अन् तर्कशक्तीला चालना मिळाली पाहिजे. रश्मी गुजराथी यांच्या बालकथा हे निकष पूर्ण करणाऱ्या आहेत!” डॉ. दिलीप गरुड म्हणाले की, “मुले ही राष्ट्राचा ठेवा आहेत; आणि हा ठेवा सक्षम करण्याचे काम बालसाहित्य करते. रश्मी गुजराथी यांच्या कथा वाचनीय असल्याने त्या मुलांना वाचनासाठी आकृष्ट करू शकतात!” सीमा गांधी यांनी, “शब्दांशी, साहित्यांशी अन् पुस्तकांशी मैत्री मुलांमधून उद्याचे सुजाण नागरिक घडवत असते. रश्मी गुजराथी यांच्या कथा मुलांना निश्चितच सुसंस्कारित करणाऱ्या आहेत!” असे गौरवोद्गार काढले. लेखिका रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून, “मुलांच्या बालसुलभ प्रश्नांची उत्तरे शोधताना नकळत बालकथा लेखनाची वाटचाल गवसली!” अशा शब्दांतून आपल्या लेखनाचे मर्म उलगडून सांगितले.

अस्मानी गुजराथी याच्या बालकविता आणि रोहित गुजराथी याने व्यक्त केलेल्या आपल्या आईविषयीच्या हृद्य भावनांनी उपस्थितांना भारावून टाकले. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रकाश सकुंड, सुषमा जोशी, राहुल भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
रोहित गुजराथी, रवींद्र गुजराथी, रुचिता जोशी, यांनी संयोजनात परिश्रम घेतले. रूपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री गुजराथी यांनी आभार मानले. मधुराधा राईलकर आणि पल्लवी नेरूरकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button