चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी!” – नाना शिवले

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असते!” असे विचार शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी  चिंचवड येथे व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमढेरे लिखित ‘हरिबंध’ या कवितासंग्रहाचे आणि ‘रत्नांजली’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन करताना नाना शिवले बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे आणि कवयित्री उज्ज्वला ढमढेरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

नाना शिवले पुढे म्हणाले की, “शब्दांची पूजा करणार्‍या व्यक्तींचे जीवन नेहमी समृद्ध असते. उज्ज्वला ढमढेरे यांच्या कविता हृदयस्पर्शी आहेत!” किसनमहाराज चौधरी यांनी, “प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असला पाहिजे तरच तो विद्यार्थ्यांमधील राजहंस ओळखणारा आदर्श शिक्षक होतो!” असे मत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी, “कवितेला वेदकाळापासूनची प्राचीन परंपरा लाभली आहे. करोना काळात उज्ज्वला ढमढेरे यांनी सामाजिक जाणिवेतून काव्यलेखन केले. काव्यसंग्रहात समाविष्ट असलेल्या त्यांच्या शंभर कविता या जणू शंभर नंबरी सोने आहेत!” असे गौरवोद्गार काढले. राजेंद्र घावटे यांनी, “कविता हा सर्जनशील मनाचा हुंकार असून ‘हरिबंध’मधील कविता कुसुमाग्रजांच्या शैलीची आठवण करून देतात!” अशी मीमांसा केली.

कवयित्री उज्ज्वला ढमढेरे यांनी मनोगतातून, “शालेय वयात वाचनातून रसग्रहण करण्याची आणि कवितालेखनाची आवड निर्माण झाली. अल्पशिक्षित आजीला मौखिक काव्यनिर्मितीचे वरदान लाभले होते. ‘हरिबाई’ या तिच्या नावाची स्मृती म्हणून ‘हरिबंध’ आणि आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नांजली’ या संग्रहांची निर्मिती झाली आहे. कवितालेखनाने खूप आनंद दिला; तर अध्यापन करताना विद्यार्थ्यांना कवितावाचनाची दृष्टी देऊ शकले, याचे समाधान वाटते!” अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. दिलीप गरुड यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “लेखनसाधना ही कष्टसाध्य कला आहे. ‘हरिबंध’ या संग्रहातील कविता सुबोध आणि गेय आहेत!” असे प्रतिपादन केले.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि ईशस्तवन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्योती तापकीर आणि वंदना इन्नाणी यांनी ‘हरिबंध’मधील कवितांचे अभिवाचन केले. संभाजी ढमढेरे, शिवाजी ढमढेरे, रवींद्र चव्हाण, अनंत हरसोळे, शंकर विचारे, राजवर्धन शितोळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राधिका भोईटे आणि सुनीता तिकोने यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button